ब्रेकिंग न्यूज़मुंबई शहर

मुंबई महानगर पालिकेतील जातीयवाद मोडणार, संघमित्रा संदानशिवला न्याय मिळवून देणार : तानसेन ननावरे

मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणा-या मुंबई महानगर पालिकेत मागासवर्गीय व सवर्ण असा भेद गंभीर बाब पुढे आली असून या प्रकरणाची गंभीर दखल ‘युनायटेड रिपब्लिकन पक्षाने’ घेतली आहे. न्यायदान करणा-या विधी खात्यात वरिष्ठ अधिकारी संघमित्रा संदानशिव यांना डावलून कनिष्ठ सुनिल सोनावणे यांना बढती दिल्याने मुंबई महानगर पालिकेचा हा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणार असल्याची माहिती युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तानसेन ननावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

मुंबई महानगर पालिकेतील सर्वात भ्रष्ट खाते म्हणून विधी खात्याची ओळख जगजाहीर आहे. अँड. संघमित्रा संदानशिव या मागासवर्गीय बौध्द अधिकारी महिलेला डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी सोनावणे यांना प्रमुख पदावर प्रमोशन देण्यामागे कुणाचा हात आहे. याचा शोध घेवून प्रयत्नांची परिकाष्ठा करु, याबाबत लवकरच महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेणार असल्याची माहिती तानसेन ननावरे यांनी दिली आहे. या संदर्भात आंबेडकरी समाजात जनजागृती करुन व्यापक आंदोलन करण्यासाठी एक रणनिती तयार करणार असल्याचेही ननावरे यांनी सांगितले. यासंदर्भात आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी ९ सप्टेंबर २०२३ रोजी लोकमान्य टिळक सभागृह मुंबई मराठी पत्रकार संघ महापालिका मुख्यालय बोरीबंदर सीएसटी आझाद मैदानाच्या बाजूला एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तानसेन ननावरे यांनी सांगितले. या बैठकीत मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार तसेच मुंबई महानगर पालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार व जातीयवाद नष्ट करण्यासाठी या बैठकीत चर्चा व रणनिती तयार करणार असल्याचे ननावरे यांनी सांगितले.